थांबावे हे दुष्टचक्र...
आज
साठी शांत होताना मन मात्र अशांत आहे. वाढती जीवघेणी स्पर्धा, अपघात, खून
यांचे वाढत चाललेले प्रमाण आणि बोकाळलेला भ्रष्टाचार दिसला, की मन उद्विग्न
होते. वाईट गोष्टींची आहुती दिली गेल्यावरच खरी शांतता लाभेल... वयाची साठ वर्षे पूर्ण होऊन त्या दिवशी मला 61 वे वर्ष लागले. सकाळीच मुलाने व सुनेने माझा आवडता "पाइनापल पेस्ट्री' समोर ठेवून मला कापायला लावले आणि माझे तोंड गोड केले. दिवसाची सुरवात छान गोड झाली. माझ्या मुलीचाही शुभेच्छा देण्यासाठी फोन आला. तसेच इतर नातेवाईक व मैत्रिणींचे फोन आले. सायंकाळी सुनेने औक्षण केले व बडा खानाही. मनाला फार बरे वाटले. मनात सहजच विचार आला, की हे प्रेम, ही माया अशीच शेवटपर्यंत टिकून राहू दे.
या निमित्ताने मनात माझ्या आयुष्याच्या सुरवातीपासून आत्तापर्यंची पाने उलटू लागले. तशी मी साधारण परिस्थितीत वाढले. इतर मुलींसारखीच 11 वी मॅट्रिक झाले. कॉलेजमध्ये जायची परिस्थिती नसल्याने नोकरी करणे प्राप्त होते. माझी आईसुद्धा नोकरी करत होती; पण तेव्हाच्या वयात नोकरी करण्यास मावशीच्या मिस्टरांनी विरोध केला व माझी व माझ्या बहिणीची सुरवातीची फी भरून आम्हाला कॉलेजमध्ये घातले. त्यामुळेच आम्ही ग्रॅज्युएट झालो. मला पुढे एस.वाय.बी.कॉम.ला असतानाच एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजद्वारे केंद्र सरकारची नोकरी मिळाली. याच नोकरीने मला संपूर्ण आयुष्यात खूप आधार दिला व अजूनही आहे. माझी दोन मुले म्हणजे मोठी मुलगी व धाकटा मुलगा दोघेही त्यांच्या वयाच्या चार महिन्यांपासून पाळणाघरात होते. ही गोष्ट थोडी फार उोशिपीशीं करण्याकरिता व मिस्टर व मुलांच्या आग्रहाखातर मी वयाच्या 51 व्या वर्षी त.ठ.ड. घेतली. मला रिटायर होऊन नऊ ते दहा वर्षे झाली. रिटायर झाल्यावर घरकाम व इतर छंदात वेळ छान जायचा; पण तीन वर्षांपूर्वी ऍक्सिडेंटमुळे झालेल्या हातापायाच्या दुखण्याने काही काळ काळजीत गेला. आता त्या दुखण्यातून मी सावरले आहे. दुखण्यादरम्यान मला माझ्या घरच्यांनी व आप्तस्वकीयांनी जी अनमोल सा थ दिली, आधार दिला त्याबद्दल मी अत्यंत ऋणी आहे. आत्ता एकसष्ठीच्या उंबरठ्यावर असताना मी पूर्ण सुखी व समाधानी आहे. पण आजकाल आपल्या आजूबाजूला ज्या घडामोडी होत आहेत व जी आपल्या देशात, आपल्या राज्यात काय किंवा आपल्या पुणे शहरात परिस्थिती आहे ती फारच उद्वेगजनक आहे. मुलांची शाळा-कॉलेजमधील ऍडमिशनसाठची खेचाखेच, धावपळ, प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धा, लांबलांबच्या नोकऱ्या, कामांचे जादा तास, नोकऱ्यांमधील अस्थिरता, तसेच अपघात, खून, मारामाऱ्या, भ्रष्टाचार, दहशत याबद्दलच्या बातम्या ऐकल्या की मन सुन्न होते. नोकरी-व्यवसायाला गेलेली आपली माणसं घरी येईपर्यंत काळजी वाटायला लागली आहे. पुणे शहर इतके दिवस सुरक्षित वाटत होते, ते त्याच्या सर्व क्षेत्रांतील कक्षा रुंदावल्यामुळे असुरक्षित झाले आहे. या सर्व गोष्टी कुठे जाऊन थांबणार याला अंतच नाही, या विचाराने जिवाची उलघाल होते. हे सगळे थांबण्यासाठी सध्या तरी काही उत्तर नाही असे वाटते. मरणाशिवाय यापासून सुटका नाही असे वाटून उतार वयात नैराश्य येते.
ही सर्व परिस्थिती सुधारण्यासाठी, मी एकसष्ठीनिमित्त देवाजवळ हीच प्रार्थना करते, की आजची परिस्थिती बदलावी. आपले सरकार कडक होऊन त्यांचा राज्य कारभार स्वच्छ व्हावा, जेणेकरून आपले सर्वांचे जीवन सुसह्य व सुखी होईल. अशा पांढऱ्या, स्वच्छ कारभाराला पवित्र भगवी व मंगलमय हिरवी जोड असलेली किनार लाभू दे. अशा तिरंगी झेंड्याला आमचा ताठ मानेने सलाम असेल. ही आमची प्रबळ इच्छा आहे व त्या पहाटेची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. सर्व वाईट गोष्टींची आहुती दिली जाईल, तेव्हाच माझ्यासारख्या साठीच्या लोकांची खऱ्या अर्थाने "साठी-शांत' होईल. त्यासाठी वेगळा यज्ञ किंवा होम-हवन करण्याची काहीच जरूर नाही...
लेखिका
नीलिमा प्र. रिसबूड
संदर्भ - इ-सकाळ पेपर
No comments:
Post a Comment