Saturday, January 14, 2012

।। जसे लढले पानिपती ।।

मृत्यू दारी आला अन् फडाबाहेर थांबला
पानिपताच्या बोचरया थंडीत गारठून गेला
माझी नजर पडताच, थोडा गहीवरुन गेला
अन् आज्ञा मिळताच फडात येऊन बसला

काही शब्द प्रेमाचे तो माझ्याशी बोलू लागला
मधेच आमच्या मर्दांगीला शाबासकी देऊ लागला
आमच्या अडचणीची त्यालाही फिकीर होती
माझ्या मावळ्याना शेवटी त्याचीच साथ होती

एकटक नुसता तो माझ्याकडेच बघत होता
खोलवर मनात त्याला "विश्वास" दिसत होता
ते कोवळ पोर जेव्हा माझ्या सोबतीला दिल
त्याच्यासाठी मुठीत माझ्या कोठून बळ आलं ?

आमची हिंमत पाहून त्याचीही छाती फुगली
रिकामी खळगी पाहून बोबडीहि थोडी वळली
का लढत होतो आम्ही ? अन् कुणासाठी ?
दिल्लीच्या रक्षणासाठी आणि वचनाला जगण्यासाठी..

गनिमहि तसा खूप कंटाळून गेला होता
छोट्याश्या एका प्याद्यासाठी तोही लढत होता
ना नफा ना तोटा त्याला मिळणार होता
सरतेशेवटी खरारा काढणार्‍यांच्या घशात जाणार होता

आदल्या दिवशी विश्वासला डोळे भरून पाहिले
त्याची कांती पाहून मग मृत्युचेही डोळे दिपले
स्त्रियांमधे "मस्तानी" तर मर्दांमधे तोच होता
दिल्लीच्या गादीवर बसणारा पहिला मर्द मराठा होता

तांबडे फुटण्याआधी यमाने माझा निरोप घेतला
कोंड्याची चतकोर भाकर खाऊन तोही तृप्त झाला
सवयी प्रमाणे मग मी बाराशे नमस्कार घातले
सूर्याला अर्ध्य देऊन मग चिलखत चढवले

पहाटे पहाटे सगळ्यानाच स्फुरण चढले
गनिम पाहून मग हात शिवशिवू लागले
गारद्यानी तोफा डागून लढाईला तोंड फोडले
"हर हर महादेवा" च्या डरकाल्या मावळे फोडू लागले

तहान भूक विसरून सगळे आग ओकू लागले
रक्ताने माखलेल्या हाताने रक्त पिऊ लागले
मर्दांगीचे भूत जणू विश्वास रावांत घुसले
भरलेल्या छाताडावर शत्रुंचे वार झेलले

विजय मला आता स्पष्ट दिसत होता
दुरुनच हसर्‍या चेहर्‍याने खुणावत होता
आनंदाने माझ्या मनी यशाच्या उकल्या फूटल्या
पुढच्या क्षणाला मग दुखाच्या ठिणग्या उडाल्या

लढता लढता माझा "विश्वास" रणांगणात हरवला
जमिनीच्या कुशीत तो मर्द मराठा सुखावला
अंबारीतुन "लालमणी" वर मग मी झेपावलो
फुरफूरनार्‍या लालमणीहून मीही गर्दीत मिसळलो

पातीला पातीला घासून आगीच्या ठिणग्या उडाल्या
तितक्याच मला गारद्यांच्या निर्जीव माना दिसल्या
कोण्या देशातला तो? का आपल्या साठी लढला?
भगव्याखाली लढणारा तोही मर्द मराठा जाहला

तिरपी किरणे सूर्याची डोळ्यावर येऊ लागली
लढता लढता डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली
वाट माझ्या सुटकेची होती जरी मोकळी
डोळ्यांसमोर "विश्वास" ची आकृती दिसू लागली

रक्ताचा सडा जणू त्या पनिपतावर सांडला
मातृभूमीला आगळा अभिषेक मराठ्यांनी घातला
नंगी सांशेर घेऊन मग सांशेर सुद्धा खूप लढला
"बाजीरावा" चा पुत्र म्हणून रण-मैदान गाजवला

सरते शेवटी लढता लढता "समशेर्" ही मुर्च्छित पडला
शेवटच्या श्वासपर्यंत "भाऊ" च त्याला दिसला
तलवारीच्या घावांनी मग मीही शांत झालो
मृत्यूला दिलेले वचन पळून मीही निद्रीस्त झालो
.......                                                                   लेखक -अजय कोपरे

No comments:

Post a Comment