Thursday, January 12, 2012

एकदा माझ्यापरि, मजला जगावे वाटते

संदीपची एक नवीन आणि अप्रतिम कविता इथे (संदर्भ लागावा म्हणून शेरच्या मध्ये संदीप जे बोलतो, त्यासकट) पोस्ट करत आहे.

एकदा माझ्यापरि, मजला जगावे वाटते
अन्य ना दुसरे कुणी, मज मीच व्हावे वाटते ॥ धृ ॥

वाट कधीची पाहतो मी, तुज पहावे वाटते
वाट बघताना तुझी मी, तू बघावे वाटते ॥ १ ॥

(दोन प्रेमी-प्रेमिका कश्या खोड्या काढतात एकमेकांच्या यावरचा खालचा शेर)

भेटीच्या दुर्मिळ क्षणी, बोलू नयेसे वाटते
वाटते मुद्दाम तिजला, मज स्वभावे वाटते ॥ २ ॥

(कधीकधी हातातला हात सुटून जातो आणि मग ती व्यक्‍ती आयुष्यामध्ये अगदी नकोशी होऊन जाते. त्यावरचा शेर)

लोचनी - स्वप्नांतूनी - जगण्यातूनी - स्मरणातूनी
सांग मी अजूनी तुला, कोठे नसावे वाटते ॥ ३ ॥

(बदलतात म्हणजे येवढी बदलतात माणसं,की हिंदीमध्ये एक फार चांगला शेर आहे:-
कल तक तो अश्ना[अनोळखी] थे,
मगर आज गैर हो ।
दो दिन में ये इजाज है,
आगे की खैर हो ॥
त्यावरचाच हा पुढचा शेर)

केवढ्याला घेतला तू, हा तुझा चेहेरा नवा
त्याच बाजारामध्ये, मजलाही जावे वाटते ॥ ४ ॥

(काही माणसं आपल्याला अशी भेटतात की त्यांना कुणी काही विचारो-न विचारो, ते आपली स्वतःविषयीची माहिती देत असतात. त्यावरचा शेर)

का अशी इच्छा मला, होते गलिच्छा सारखी
का असे माझ्याच विषयी, बडबडावे वाटते ॥ ५ ॥

(देवाला आपण निर्गुण - निराकार म्हणतो, पण थोडासा अन्याय करतो आपण त्याच्यावरती. त्याविषयचीचा हा पुढचा शेर)

राहूदे तो बंद गाभारा, जरा उघडू नका
कधीतरी त्या ईश्वरालाही रडावे वाटते ॥ ६ ॥

("कवितेविषयी मार्गदर्शन द्या" असं जेंव्हा लोक विचारतात तेंव्हा त्यांना जे सांगावसं वाटतं ते या पुढच्या शेरमध्ये)

थांब तू पहिलीच कविता, खरडण्या आधी जरा
मधरात्री जाग अन्‌ दिवसा निजावे लागते ॥ ७ ॥
                                                                                                            ( सौ .मराठी कविता  )

No comments:

Post a Comment