Monday, January 16, 2012

एकाकी - एका बापाची कथा

नवे फूल संसारवेलीस आले, मिळाली जशी बातमी, धावला
सुखाला न काहीच सीमा अता बाप वेडावला फक्त वेडावला
तिथे वेगळे दुःख आहे नशीबी जरा कल्पनाही मनाला नसे
नवे फूल देऊन गेली लता, वृक्ष संसाररूपी न फोफावला

अता बाळ आईविना राहिला, त्यास सांभाळले पाहिजे हे खरे
कसे का असेना मुलाला तरी वाढवायास आता हवे हे खरे
'तिचे रूप मानू मुलाला अता' बाप बोले स्वतः शी, धरे धीरही
कसेही असो दैव, मानून ते माणसाने पुढे जायचे हे खरे

घरी बाळ आला, तशी सांत्वनाला किती माणसे लोटली त्या घरी
मुठी चोखता बाळ पाहून घे विस्मयाने घराला कितीदा तरी
रडू येतसे भूक लागेल तेव्हा, नसे त्यास आई, बिचाराच तो
जरी बाप होता, तरी माय ती माय, तृष्णा न भागेल पाण्यावरी

कधी दूध पाजा नि आंघोळ घाला, कधी झोपवा आणि जागे रहा
कशाने रडे, तो न झोपे कशाने, कसे खेळवावे मुलाला पहा
कितीही जरी लोक आले "बघू का" म्हणायास, काही क्षणांचेच ते
असा काळ काढून बाळास आता पुरे होत आलेत महिने सहा

लळा लागला त्यास, बापास त्याचा, अता सर्व मार्गावरी लागले
अता बाप कामासही जात होता, कुणी ना कुणी बाळ सांभाळले
जरा काळ आणीक गेला, अता बाळ बोलायला लागला बोबडे
तरी शब्द पहिलाच 'आई' निघाला, नि ऐकून ते बापही गलबले

अता खेळणी, गोष्ट काऊचिऊची, सुरू जाहली जेवताना मजा
धरा रे, पळा रे, करा गाइ आता, किती यायची खेळताना मजा
कुशीतून बापास तो बोबडे बोल ऐकावयाचा नि झोपायचा
मजा झोपताना, मजा जागताना, मजा सर्व ते पाहताना मजा

हळू काळ गेला जरासा पुढे, चार वर्षे पुरी होत आली अता
अता घातले त्यास शाळेत, इच्छा पित्याची फलद्रूप झाली अता
डब्याला बिचारा स्वतः लाटुनी बाप पोळ्या असे देत बाळास त्या
तसा रोजचाही स्वयंपाक शिकला, घराचा असे तोच वाली अता

कधीही न रागावला बाप पोरावरी, एकदाही न फटका दिला
बघे चित्र तो बायकोचे, रडे आणि सांगे कहाण्या मुलाच्या तिला
वही, पुस्तके, दप्तरे, खेळणी, सर्व संस्कार, अभ्यास चालू असे
कसासा तिच्यावीण तो काळ त्याने स्वतः एकट्याने असा काढिला

"कधीही न नेलेत हॉटेलमध्ये, कधीही न मी चित्रपट पाहिला
कधीही न मी बागही पाहिली, सर्कशीचा तसा योगही राहिला"
"तसा फार पैसा नसे" बोलला बाप "माझ्याकडे बाळ, सांगू कसे?"
बिछान्यात रात्री बिचारा रडे एकटा बाप, अश्रू छुपा वाहिला

उधारी करोनी पुरे लाड केले, कशीशी उधारी पुरी फेडली
स्वतःची दिली चार पैश्यात आणी मुलाला नवी सायकल घेतली
जरा ताप आला मुलाला कधी की पुरी रात्र जागायचा बाप तो
स्वतःची कधी प्रकृती पाहिली ना जरा तापता पाठही टेकली

सफारी मुलाला हवा याचसाठी दिली ट्रंक भगारवाल्यासही
सहल-वर्गणीला करे काम जास्ती पुन्हा येउनी सर्व स्वैपाकही
दहाव्वीस आले बरे गूण आता पुढे शिक्षणाला किती खर्च तो
करे नोकऱ्या तीन, कर्जे करोनी प्रवेशास दे देणगी बापही

कधी ऐकले, पोरगा बोलला वाक्य मित्रांपुढे एक खुश्शालसा
"कसे यायचे आज पार्टीस मी बाप माझा असे यार कंगालसा"
तसे वाक्य ऐकून, वाईट वाटून, पाणावली लोचनेही जरी
स्वतः औषधे टाळुनी देत पैसे मुलाला म्हणे 'जाच खुश्शालसा"

जशी लागली नोकरी त्या मुलाला सुखावून गेला तसा बाप तो
उभा राहिला आपला बाळ आता, जरा आपलाही घटे व्याप तो
म्हणे पोरगा एक मैत्रीण आहे, तिच्याशी अता लग्न लावून द्या
मनाशी म्हणे बाप, हा काय आनंद आहे, मनाला पुऱ्या व्यापतो

जसे लग्न झाले, घराला जराशी कळा चांगली यायला लागली
नवी सून होती किती लाघवी, बाप मानायचा पोरगी आपली
घराला तिने सजविले, सर्व कामे बघू लागली एकट्यानेच ती
मुलाला उरे स्वर्ग बोटांवरी पाहुनी लाडकी बायको आपली

तशातच घरी पत्र आले मुलाला, नव्या नोकरीचे, मनासारख्या
पगारात होती किती शुन्य जाणे, सुवीधा न त्या मोजण्यासारख्या
म्हणे पर्वणी जाहली, बाप बोले, समाधान ती सूनही पावली
पुढे बाळ बोले अशी पाहिजे, नोकऱ्या त्या नको 'भारतासारख्या'

कळेनाच बापास की काय बोलून गेला असे पोरगा आपला
जराश्यात ते स्पष्ट झाले नसे नोकरी येथली, बाप खंतावला
"नको रे मुला, का कशाला उगी जायचे त्या तिथे, काय आहे तिथे?"
परंतू सुनेने मुलाचीच बाजू जशी घेतली, तो म्हणू लागला

"मुलांनो, अरे मी कसे यायचे त्यातिथे, जन्म माझा असे येथला"
मुलाने शिसे ओतले, कान जाळून तो शब्द बापाकडे पोचला
"तुम्हाला कुठे यायचे त्यातिथे, त्यातिथे फक्त आम्हीच जाणार हो"
असे वाक्य ऐकून, आधार शोधायला लागला, बाप तो मोडला

रडू थांबता आज थांबेचना, बाप बोले "नकारे, नका जाउ की"
"कसेही असो आज उत्पन्न, आपण सुखाने घरी आपल्या राहु की"
म्हणे पोरगा "अल्पसंतुष्टता हीच तुमची सदा भोवली आजवर"
तरीही बिचारा म्हणे बाप "जाऊ नका रे, कुठेही नका जाउ की"

"अरे एकट्याने कसे मी जगावे, मला सांग तुमच्यामुळे मी जगे"
"न आई तुझी राहिली, सांग पोरा, कसे एकट्याने जगावे म्हणे? "
मुलाला, सुनेला न काहीच होते, निघालेच ते दूरदेशाकडे
पुरी तीन वर्षे अता जाहली, बाप आता इथे एकट्याने जगे

कधी जाग येते, जणू बाळ रडले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी घास काऊचिऊचा न चाले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी सर्कशीला न पैसेच उरले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी सायकल घेतली, छान झाले, असे वाटते, तो रडू लागतो

कधी घेतलेल्या सफारीत चाले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी देणगीचे पुरे कर्ज झाले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी एक पार्टीस पैसे पुरवले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी वाटते मूल झालेच नाही, असे वाटता तो रडू लागतो

अता प्रकृती साथ देते कुठे, आज कोणीच नाही बिचाऱ्यास त्या
पुरा जन्म वायाच गेल्यापरी भावना व्यापणारी बिचाऱ्यास त्या
कधीही नका यार आधार काढू पित्याचा कुणी, एवढेसे करा
कथा आठवा एवढी, द्या समाधान, आणीक शांती बिचाऱ्यास त्या

                                                                                     आभार -मुन्ना बागुल

No comments:

Post a Comment