आज अचानक जागी झाली
कधीतरी निजलेली गाणी
सांजवात होऊन तेवली
मनातली विझलेली गाणी ||
दबले, बुजले, घुसमटलेले
सूर विजेसम लख्ख चमकले,
घन बरसावे तशी बरसली
कंठातच थिजलेली गाणी ||
भुरभुरता पाऊस कोवळा
संध्यारंगातून झिरपला,
किरणांच्या छायेत उतरली
थेंबांवर सजलेली गाणी ||
नवथर मातीच्या ओलेत्या
देहाच्या परिमलात घुमली,
दरवळली अन तिच्या कुशीतुन
कोंबांसह रुजलेली गाणी ||
निळेसावळे ओले अंगण,
तुझ्या नि माझ्या मनात श्रावण,
रानोरानी, पानोपानी
भिरभिरती भिजलेली गाणी ||
असाच अवखळ पाउस होता,
अन उडणारी एकच छत्री,
आठवली का हळूच माझ्या
कानी कुजबुजलेली गाणी?
कवयित्री: क्रान्ति
No comments:
Post a Comment