खोल या हृदयात उठली वादळे
"येत नाही, तोच घाई जायची
रीत कसली ही तुझी समजायची?"
"सोड ना रे, वाट अंधारायची!"
का तुला माझी असोशी ना कळे?
खोल या हृदयात उठली वादळे
"रंगते मन आजही भासामध्ये
श्वास माळू दे जरा श्वासामध्ये"
"अर्थ आहे या खुळ्या ध्यासामध्ये?"
जाणतो, आशा तरी ना मावळे!
खोल या हृदयात उठली वादळे
"हात हाती राहु दे, सोडू नको,
हास्य या ओठांतले मोडू नको!"
"जीवनाची वेस ओलांडू नको!
थांब ना, अडती तुझीही पावले!"
खोल या हृदयात उठली वादळे
"तो उभा दारी, कसे थांबायचे?
तो जिथे नेईल तेथे जायचे
तू मला स्मरणात सांभाळायचे!"
एवढे बोलून सारे संपले!
खोल या हृदयात उठली वादळे
कवयित्री: क्रान्ति
No comments:
Post a Comment